भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले
ठेविले आजन्म डोळे, आपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी, मज भिजावे लागले
लोक भेटायास आले, काढत्या पायासवे
अन अखेरी कुशल माझे, मज पुसावे लागले
गवसला नाहीच मजला, चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले
एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले
Comments
Post a Comment